'कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे निकृष्ट नाली बांधकाम?' इवळेश्वरमध्ये संतप्त ग्रामस्थांचा थेट सवाल
मातीमिश्रित रेती, काँक्रीटऐवजी गोट्यांचा वापर; ठेकेदाराच्या मुजोरीने नागरिक संतप्त, सरपंच-उपसरपंच व ग्रामसचिवांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
आर्णी (प्रतिनिधी): आर्णी तालुक्यातील इवळेश्वर येथे सुरू असलेल्या नाली बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून, या प्रकारामुळे गावात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाली बांधकामासाठी मातीमिश्रित रेतीचा वापर केला जात असून, सिमेंट काँक्रीटच्या ऐवजी मोठ्या प्रमाणात गोटे टाकून काम उरकले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शासनाच्या निधीतून सुरू असलेल्या या कामामध्ये आवश्यक तांत्रिक निकषांचे पालन होत नसून, दर्जाहीन साहित्यामुळे नालीचे आयुष्य कमी होणार आहे. त्यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
याबाबत ठेकेदाराला जाब विचारला असता त्याने समाधानकारक उत्तर देण्याऐवजी उलटसुलट आणि उद्धट भाषेत बोलून नागरिकांनाच धाक दाखविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा संताप अधिकच वाढला आहे.
यामुळेच "या ठेकेदाराला सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसचिव यांचे अभय आहे का?" असा थेट प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तसेच जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, आर्णी यांच्या देखरेखीखाली काम सुरू असताना इतक्या उघडपणे निकृष्ट दर्जाचे बांधकाम कसे सुरू आहे, याबाबतही नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
ग्रामस्थांनी या प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून कामाची गुणवत्ता तपासावी, निकृष्ट काम तात्काळ बंद करावे, संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे तसेच दोषी अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या वृत्तातील आरोप हे स्थानिक नागरिकांनी केलेल्या दाव्यांवर आधारित असून, संबंधित ठेकेदार, सरपंच, उपसरपंच, ग्रामसचिव आणि जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, आर्णी यांची अधिकृत भूमिका प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.


No comments:
Post a Comment