महागाव पोलिसांच्या गुन्ह्याचा काही तासांत छडा; घरफोडी प्रकरणातील आरोपी जेरबंद, चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Saturday, June 6, 2026

महागाव पोलिसांच्या गुन्ह्याचा काही तासांत छडा; घरफोडी प्रकरणातील आरोपी जेरबंद, चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त

महागाव पोलिसांच्या गुन्ह्याचा काही तासांत छडा; घरफोडी प्रकरणातील आरोपी जेरबंद, चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त

महागाव, (प्रतिनिधी / शेख नूर शेख हैदर) : महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्याचा काही तासांतच छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) यवतमाळ कॅम्प पुसदच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आरोपी सूरज प्रकाश पवार (रा. आठवडी बाजार, फुकटनगर, महागाव) याला ताब्यात घेण्यात आले असून गुन्ह्यातील १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

महागाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा क्रमांक २१९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(३) व ३३१(४) नुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ (कॅम्प पुसद) यांचे विशेष पथक पुसद व उमरखेड उपविभागात रवाना करण्यात आले होते.

तपासादरम्यान पथकाने गोपनीय माहिती संकलित करून संशयितांचा शोध सुरू केला असता, सदर घरफोडीचा गुन्हा सूरज प्रकाश पवार व त्याच्या अन्य तीन साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली. तसेच सूरज पवार हा महागाव बाजारपेठ परिसरात फिरत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने सापळा रचून त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी कौशल्यपूर्ण चौकशी करत त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीने आपल्या अन्य तीन साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली.

चौकशीतून उघड झाले की, आरोपींनी महागाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या इमारतीतील दरवाज्याची कडी-कोयंडा तोडून घरफोडी केली होती. या चोरीमध्ये महाविद्यालयातील संगणक, प्रिंटर तसेच इतर साहित्य चोरून नेण्यात आले होते.

आरोपीच्या कबुलीजबाबावरून पोलिसांनी चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. यामध्ये दोन सीपीयू, एक संगणक मॉनिटर, एक प्रिंटर, की-बोर्ड व माऊस असा सुमारे ३० हजार रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत उलगडा झाला असून चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे महागाव परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu