यवतमाळ विधान परिषद निवडणूक वादाच्या भोवऱ्यात; चौकशीसाठी काँग्रेसचा आग्रह
यवतमाळ, प्रतिनिधी : यवतमाळ स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणूक 2026 संदर्भात काँग्रेस पक्षाने गंभीर आक्षेप नोंदवत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. सचिन नाईक यांनी दिलेल्या निवेदनात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. सोहेलराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यामागे दबाव, प्रलोभन अथवा आर्थिक व्यवहार झाले असल्याची शंका व्यक्त करत या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, निवडणूक प्रक्रिया ही मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पडणे अपेक्षित असते. कोणत्याही उमेदवाराने दबाव, धमकी, आर्थिक व्यवहार किंवा इतर कोणत्याही अनुचित कारणामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असेल, तर ते लोकशाही प्रक्रियेला बाधा आणणारे असून मतदारांच्या घटनात्मक अधिकारांवर परिणाम करणारे ठरते. त्यामुळे या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.काँग्रेसच्या निवेदनानुसार, श्री. कांबळे यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र त्यानंतर कोणतीही सार्वजनिक चर्चा न होता त्यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने विविध शंका निर्माण झाल्या आहेत. या घटनेमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, अंतिम टप्प्यात केवळ एकच उमेदवार शिल्लक राहिल्यास मतदारांना आपला निषेध नोंदविण्याचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मतदान प्रक्रियेत NOTA (None of the Above) पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे. मतदारांना निवडीचा अधिकार मिळावा आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी हा पर्याय आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या या निवेदनामुळे यवतमाळ विधान परिषद निवडणुकीभोवतीचे राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता असून, प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



No comments:
Post a Comment