पहाटे वडगाव पोलिसांची मोठी कारवाई; पाच हातभट्ट्या उद्ध्वस्त, ८,३०० लिटर मोहसडवा नष्ट - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Wednesday, June 3, 2026

पहाटे वडगाव पोलिसांची मोठी कारवाई; पाच हातभट्ट्या उद्ध्वस्त, ८,३०० लिटर मोहसडवा नष्ट

पहाटे वडगाव पोलिसांची मोठी कारवाई; पाच हातभट्ट्या उद्ध्वस्त, ८,३०० लिटर मोहसडवा नष्ट


अकोला बाजार, प्रतिनिधी : जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने अवैध दारू व्यवसायाविरोधात कडक मोहीम सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून वडगाव पोलिसांनी पहाटेच्या सुमारास मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत दुधाना व चापडोह धरण परिसरातील पाच गावठी हातभट्टी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले असून तब्बल ८,३०० लिटर मोहसडवा नष्ट करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी २ जूनच्या रात्री जिल्ह्यात शंभर टक्के दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिल्यानंतर वडगाव पोलीस ठाण्याने अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली. ठाणेदार सपोनि विकास दांडे यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली होती.

गुप्त माहितीच्या आधारे ३ जून रोजी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास दुधाना आणि चापडोह धरण परिसरातील जंगल व दुर्गम भागात छापेमारी करण्यात आली. या वेळी गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या पाच अड्ड्यांवर एकाच वेळी धाड टाकण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला ८,३०० लिटर मोहसडवा जप्त करून नष्ट केला.

जप्त करण्यात आलेल्या मोहसडव्याची अंदाजे किंमत २ लाख ९० हजार ५०० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, उपकरणे आणि इतर सामग्रीही नष्ट करण्यात आली. या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर होणारे अवैध दारू उत्पादन रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.



या प्रकरणी पाच आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (फ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास वडगाव पोलीस करीत आहेत.



ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सपोनि विकास दांडे, पीएसआय भाऊराव बोकडे, पोलीस शिपाई अनिल गिणगुले, सागर केराम, पुकार वाकोडे, अविनाश, भागवत, अमोल आणि हितेश यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

दरम्यान, पहाटेच्या सत्रात झालेल्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून परिसरातील दारू माफियांचे धाबे दणाणले आहेत. वडगाव पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याच्या दिशेने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu