मानसिक छळ आणि धमक्यांमुळे तरुणीची आत्महत्या; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Wednesday, June 3, 2026

मानसिक छळ आणि धमक्यांमुळे तरुणीची आत्महत्या; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

मानसिक छळ आणि धमक्यांमुळे तरुणीची आत्महत्या; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल


अकोला बाजार, प्रतिनिधी : कळंब तालुक्यातील मेटीखेडा येथे मानसिक त्रास व धमक्यांमुळे एका २० वर्षीय तरुणीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वडगाव जंगल पोलिसांनी चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी पायल हरीभाऊ राठोड (वय २०) ही मेटीखेडा येथील रहिवासी होती. याप्रकरणी तिची आई सुरेखा हरीभाऊ राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला काही दिवसांपूर्वी गावातील एका युवकाने पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर २ जून रोजी सायंकाळच्या सुमारास फिर्यादीचे पती आणि संबंधित युवकाच्या मित्रामध्ये वाद झाला होता.

याच वादानंतर रात्रीच्या वेळी आरोपी म्हणून नमूद करण्यात आलेले चार जण फिर्यादीच्या घरी आले. त्यांनी कुटुंबीयांशी वाद घालत धमकावल्याचा तसेच पायल हिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. “एक मुलगी पळून गेली, दुसरीलाही पळवून नेऊ,” अशी धमकी आरोपींनी दिल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.

या प्रकारामुळे पायल मानसिकदृष्ट्या खचली होती. धमक्या आणि झालेल्या प्रकाराचा तीव्र मानसिक धक्का बसल्याने तिने घराशेजारी ठेवलेले शेतीसाठी वापरण्यात येणारे विषारी औषध प्राशन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. प्रकृती गंभीर झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिला तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी वडगाव जंगल पोलीस ठाण्यात पवन फुलसिंग जाधव, फुलसिंग सकरू जाधव, नंदा फुलसिंग जाधव आणि सुनील भटुजी आडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ३५२, ३५१(२)(३) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सपोनि विकास दांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu