यवतमाळ नगरपरिषदेत नगरसेवक कक्षांची दुरवस्था; नगरसेवकांनीच हाती घेतली स्वच्छता मोहीम
यवतमाळ :यवतमाळ नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीत नगरसेवकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या कक्षांची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. परिसरात साचलेला कचरा, ठिकठिकाणी गळणारे पाणी आणि अस्वच्छ वातावरणामुळे नाराजी व्यक्त करत काही नगरसेवकांनी स्वतः पुढाकार घेत स्वच्छता मोहीम राबविली.
नगरसेवकांसाठी राखीव असलेल्या सभागृह व कक्षांमध्ये अनेक दिवसांपासून स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत होते. काही ठिकाणी पाण्याची गळती सुरू असल्याने परिसरात घाण साचली होती. या परिस्थितीमुळे नगरसेवकांना तसेच येथे येणाऱ्या नागरिकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा
याविरोधात नगरसेवकांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवित स्वतः झाडू हातात घेत सभागृह आणि परिसराची साफसफाई केली. तसेच गळणाऱ्या पाण्यात कागदाच्या प्रतीकात्मक होड्या सोडून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमातून नगरपरिषदेतील स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटी आणि दुर्लक्षित देखभालीचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला.
नगरसेवक डॉ. नीरज वाधमारे आणि विपिन चौधरी यांच्यासह उपस्थित सदस्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नगरसेवकांसाठी उपलब्ध असलेल्या कक्षांची अशी अवस्था असेल, तर सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या नागरी सुविधा आणि स्वच्छतेची स्थिती काय असेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यवतमाळ शहरात स्वच्छता, सार्वजनिक सुविधांची देखभाल आणि मूलभूत नागरी सेवांबाबत प्रशासन अधिक संवेदनशील होणे आवश्यक असल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्त केले. नगरपरिषद प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आवश्यक दुरुस्ती, स्वच्छता आणि देखभाल उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
नगरसेवकांनी केलेल्या या प्रतीकात्मक आंदोलनामुळे नगरपरिषदेतील स्वच्छता व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासन यावर कोणती ठोस पावले उचलते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



No comments:
Post a Comment