ज्यांनी काँग्रेसची साथ सोडली, त्यांनीच आता शिवबंधन बांधले! साहेबराव कांबळे यांच्या पक्षांतराने राजकीय वर्तुळात चर्चा
यवतमाळ : यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीपूर्वी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळूनही ऐनवेळी माघार घेत पक्षाला अडचणीत आणणारे साहेबराव कांबळे यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
एकेकाळी काँग्रेसचे विश्वासू मानले जाणारे साहेबराव कांबळे यांनी विधान परिषद निवडणुकीत पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर अचानक माघार घेतली होती. त्यांच्या त्या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला होता. त्या घटनेनंतर पक्षनिष्ठा, राजकीय भूमिका आणि वैचारिक बांधिलकीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
आता त्याच कांबळे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्या राजकीय वाटचालीवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेसची साथ सोडणाऱ्या नेत्याने अखेर सत्ताधारी पक्षाचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र समोर आले आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, हा प्रवेश केवळ पक्षबदल नसून भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी मानला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपासून सुरू झालेल्या राजकीय घडामोडींचा हा पुढचा टप्पा असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या घडामोडीबाबत नाराजी व्यक्त होत असून "ज्यांनी पक्षाच्या विश्वासाला तडा दिला, त्यांचा खरा राजकीय हेतू आता स्पष्ट झाला," अशा प्रतिक्रिया काही कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
साहेबराव कांबळे यांच्या या निर्णयामुळे यवतमाळ जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



No comments:
Post a Comment