यवतमाळ जिल्ह्यात सौम्य भूकंपाची नोंद; घाबरू नका, अफवांपासून सावध राहा – जिल्हाधिकारी विकास मीना - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Tuesday, June 9, 2026

यवतमाळ जिल्ह्यात सौम्य भूकंपाची नोंद; घाबरू नका, अफवांपासून सावध राहा – जिल्हाधिकारी विकास मीना

यवतमाळ जिल्ह्यात सौम्य भूकंपाची नोंद; घाबरू नका, अफवांपासून सावध राहा – जिल्हाधिकारी विकास मीना

यवतमाळ, प्रतिनिधी : यवतमाळ जिल्ह्यातील नवरगाव प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या सुरला, गोधनी आणि केगाव परिसरात सोमवारी (दि. 8 जून) सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या सुमारास 3.0 रिश्टर स्केल तीव्रतेच्या सौम्य भूकंपाची नोंद झाली आहे. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झालेली नसल्याचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता कमी असल्याने नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून संबंधित विभागांकडून आवश्यक निरीक्षण केले जात आहे.

दरम्यान, भूकंपाच्या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या अफवा आणि अप्रमाणित संदेश प्रसारित होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी विकास मीना यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत स्रोतांकडून मिळालेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा तसेच कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित संदेशांचे प्रसारण करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

भूकंपाच्या वेळी काय करावे?

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. भूकंपाचे धक्के जाणवल्यास घाबरून न जाता शांत राहावे. इमारतीच्या आत असल्यास मजबूत टेबल, डेस्क किंवा भिंतीच्या आतील बाजूस सुरक्षित आसरा घ्यावा. लिफ्टचा वापर टाळावा आणि धक्के थांबल्यानंतरच सुरक्षितपणे बाहेर पडावे.

तसेच घरातील वीज, गॅस आणि इतर उपकरणांची तपासणी करावी. कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत आणि प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधा

कोणतीही आपत्कालीन माहिती अथवा मदतीची आवश्यकता असल्यास नागरिकांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक :

जिल्हा आपत्ती निवारण कक्ष, यवतमाळ : 07232-240720

पोलीस नियंत्रण कक्ष : 07232-256700

यवतमाळ जिल्ह्यात नोंदविण्यात आलेला हा भूकंप सौम्य स्वरूपाचा असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu