२४ तासांत दरोडा प्रकरणाचा उलगडा; वडगाव जंगल पोलीस पथकाचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव - Lok Vidhan News

Breaking News

Lok Vidhan News Live

LIVE TV
लोक विधान न्यूज
📺 24×7 LIVE NEWS | लोक विधान न्यूज

🔊 बातमी ऐका

Friday, June 12, 2026

२४ तासांत दरोडा प्रकरणाचा उलगडा; वडगाव जंगल पोलीस पथकाचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव

२४ तासांत दरोडा प्रकरणाचा उलगडा; वडगाव जंगल पोलीस पथकाचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव

पोलीस शिपाई सागर केराम यांच्या गोपनीय माहितीमुळे तपासाला मिळाली निर्णायक दिशा

अकोला बाजार : अकोला बाजार–रुई मार्गावरील व्यापाऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ला व दरोडा प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा लावत आरोपींना अटक करणाऱ्या वडगाव जंगल पोलीस पथकाचा जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट तपासकौशल्य, वेगवान कारवाई आणि समन्वयाच्या जोरावर गंभीर गुन्ह्याचा उलगडा केल्याबद्दल या पथकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

काही दिवसांपूर्वी अकोला बाजार येथील व्यापारी सय्यद एजाज सय्यद मुसा यांच्यावर दरोडेखोरांनी हल्ला करून रोख रक्कम लुटली होती. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे, स्थानिक गुन्हे शाखा तसेच वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या पथकाने युद्धपातळीवर तपास सुरू केला.

तपासादरम्यान वडगाव जंगल पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सागर केराम यांना आरोपींबाबत महत्त्वपूर्ण आणि विश्वासार्ह गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यांनी ही माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली. या माहितीच्या आधारे तपासाला योग्य दिशा मिळाली आणि पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचणे शक्य झाले. सागर केराम यांच्या सतर्कतेमुळे आणि माहिती संकलनातील कौशल्यामुळे गुन्ह्याच्या उलगड्यात महत्त्वाची भूमिका बजावली गेली.

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि कसून तपासाच्या आधारे अवघ्या २४ तासांत आरोपींना अटक करून गुन्ह्याचा पर्दाफाश केला. आरोपींकडून रोख रक्कम, दुचाकी आणि इतर साहित्य असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी वडगाव जंगल पोलीस पथकाचा गौरव केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे, ठाणेदार विकास दांडे, पोलीस उपनिरीक्षक भाजराव बाकडे, पोलीस शिपाई सागर केराम, अनिल गिनगुले, पुकार वाकोडे, गणेश आगे, धनंजय शेखदार, शिवाजी शिंदे, अक्षय डोंगरे यांच्यासह तपासात मोलाचे योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

अकोला बाजार परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या या गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा करून आरोपींना गजाआड करण्यात वडगाव जंगल पोलिसांना यश आले आहे. या प्रभावी कारवाईमुळे व्यापारी वर्गात पुन्हा एकदा सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून परिसरातून पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले जात आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu