जनसेवेचा ध्यास; रुग्णसेवक मुज्जू पटेल यांच्या कार्याला मानाचा मुजरा
आजच्या काळात समाजसेवेपेक्षा प्रसिद्धीला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे चित्र अनेकदा दिसून येते. सोशल मीडियावर फोटो, पोस्ट आणि प्रसिद्धीची झगमग असली तरी प्रत्यक्ष संकटाच्या वेळी मदतीचा हात पुढे करणारे लोक फार कमी असतात. अशा परिस्थितीत बेलोरा येथील उपसरपंच तथा भाजप अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष, घाटंजी येथील रुग्णसेवक मुज्जू पटेल यांनी आपल्या कार्यातून समाजसेवेचा खरा अर्थ जिवंत ठेवला आहे.
एखादा अपघात झाल्यावर किंवा एखादा रुग्ण जीवासाठी झुंज देत असताना अनेकजण सल्ले देताना दिसतात; मात्र जखमीला उचलून रुग्णालयात पोहोचवणे, रक्ताची व्यवस्था करणे, गरजू कुटुंबाला आधार देणे किंवा संकटाच्या क्षणी त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे काम प्रत्येकाला जमत नाही. हे कार्य करण्यासाठी संवेदनशील मन, सेवाभाव आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी आवश्यक असते. मुज्जू पटेल यांनी हीच बांधिलकी आपल्या कृतीतून सातत्याने सिद्ध केली आहे.
लहानपणापासून मनात रुजलेला सेवाभाव त्यांनी कधीच सोडला नाही. विविध सामाजिक उपक्रमांमधून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज युवा मित्रवर्गाच्या माध्यमातून अधिक व्यापक झाला आहे. मा. प्रा. आ. राजूभाऊ तोडसाम यांच्या प्रेरणेतून ते समाजातील गरजू, पीडित आणि संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहतात.
रुग्णसेवा, रक्तदान शिबिरे, गरजूंसाठी मदतीचे हात, अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार मिळवून देणे, आपत्तीच्या काळात धावून जाणे अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या सेवाकार्यात पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभत असून, समाजहितासाठी उभारलेले हे समन्वयाचे जाळे अनेकांसाठी जीवनदायी ठरत आहे.
समाजसेवा ही त्यांच्यासाठी प्रसिद्धीचे साधन नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे. एखाद्या गरजू व्यक्तीच्या मदतीला धावून गेल्यानंतर मिळणारे समाधान हे कोणत्याही पुरस्कारापेक्षा किंवा प्रसिद्धीपेक्षा मोठे असते, अशी त्यांची भूमिका आहे. म्हणूनच त्यांनी केलेल्या कार्याची चर्चा केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित राहत नाही, तर मदत मिळालेल्या असंख्य कुटुंबांच्या आशीर्वादातून त्यांचे कार्य अधिक मोठे होत जाते.
"जनसेवा हीच ईश्वर सेवा" या विचाराला आपल्या कृतीतून साकार करणारे मुज्जू पटेल हे आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत. फोटो, पोस्ट आणि प्रसिद्धी काही क्षणांची असते; मात्र एखाद्याचा वाचलेला जीव, संकटातून सावरलेले कुटुंब आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे हास्य हीच समाजसेवकाची खरी कमाई असते. अशा निस्वार्थ सेवाभावी कार्यकर्त्याला मनःपूर्वक सलाम!


No comments:
Post a Comment