यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; घरफोडीतील फरार आरोपी जेरबंद, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त
लोक विधान/यवतमाळ : यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने एका अट्टल घरफोड्याला अटक करून ९ लाख ३० हजार ३०८ रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. मारेगाव पोलीस ठाण्यांतर्गत झालेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्यात (अ.क्र. १४२/२०२६) पोलिसांनी यापूर्वी २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक केली होती, मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी नथ्थू नागू कुरकुटे (वय ३० वर्ष, रा. मोहदरी, ता. उमरखेड) हा तेव्हापासून फरार होता. १ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला हा आरोपी पुसद-उमरखेड रोडवरील कोपरा फाटा परिसरात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोपरा फाटा येथील 'भारत फर्निचर' समोर सापळा रचून नथ्थू कुरकुटे याला ताब्यात घेतले.
आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे सोन्या-चांदीचे दागिने सापडले. पोलिसांनी कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता, त्याने हे दागिने साधारण दोन महिन्यांपूर्वी मारेगाव परिसरातून आपल्या साथीदारांच्या मदतीने चोरल्याची कबुली दिली. तपासाअंती हा मुद्देमाल मारेगाव पोलीस ठाण्यातील दुसऱ्या एका घरफोडीच्या गुन्ह्यातील (अ.क्र. १६०/२०२६) असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी या कारवाईत ९ लाख ३० हजार ३०८ रुपयांचे दागिने जप्त करून आरोपीला पुढील तपासासाठी मारेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश चवरे, सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि धनराज हाके आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली.


No comments:
Post a Comment