विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या; 11 महिन्यांत तपास पूर्ण, आरोपीला जन्मठेप - Lok Vidhan News

Breaking News



बातमी ऐका

🔊 बातमी ऐका

Saturday, May 30, 2026

विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या; 11 महिन्यांत तपास पूर्ण, आरोपीला जन्मठेप

विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या; 11 महिन्यांत तपास पूर्ण, आरोपीला जन्मठेप


वडगाव (जि. यवतमाळ) : पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत नोंद झालेल्या या प्रकरणाचा तपास अवघ्या नऊ महिन्यांत पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. गुन्हा घडल्यापासून केवळ 11 महिन्यांत निकाल लागल्याने यवतमाळ जिल्ह्यातील बी.एन.एस. 2023 अंतर्गत शिक्षा झालेल्या पहिल्या प्रकरणाची नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील यावली येथे 3 जून 2025 रोजी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. मृत महिला बेबीबाई दत्तुराम राठोड (वय 56) या झोपलेल्या असताना त्यांचे पती दत्तुराम गुलाब राठोड (वय 59) यांनी त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत तलवारीसारख्या धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली होती.

घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. घटनास्थळ पंचनामा, जप्ती पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, साक्षीदारांचे जबाब, वैज्ञानिक पुरावे तसेच फॉरेन्सिक तपासणी यांचा आधार घेत तपासाची साखळी मजबूत करण्यात आली. जप्त केलेले पुरावे न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. याशिवाय डिजिटल पुरावे, व्हिडीओग्राफी आणि इतर तांत्रिक बाबींचाही तपासात समावेश करण्यात आला.

तपासादरम्यान आरोपीला पत्नीच्या चारित्र्याबाबत संशय असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी सर्व पुरावे संकलित करून 26 ऑगस्ट 2025 रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रकरणाची जलदगतीने सुनावणी घेण्यात आली.

सरकारी पक्षातर्फे प्रभावी युक्तिवाद करण्यात आला. साक्षीदार, पंच आणि वैज्ञानिक पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. तपास यंत्रणेने संकलित केलेले घटनास्थळावरील फॉरेन्सिक पुरावे, मोबाईलद्वारे नोंदविण्यात आलेली माहिती, पंचनामे आणि इतर दस्तऐवजी पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले.

या सर्व पुराव्यांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी दत्तुराम गुलाब राठोड याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नवीन बी.एन.एस. 2023 कायद्यांतर्गत यवतमाळ जिल्ह्यात शिक्षा झालेल्या पहिल्या प्रकरणाचा मान या खटल्याला मिळाला आहे.

या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बेसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. विकास दांडे यांनी केला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस कर्मचारी रवी चव्हाण यांनी पाठपुरावा केला, तर तपासात पोलीस कर्मचारी अनिल निमगुळे यांनी सहकार्य केले. पोलिसांच्या जलद आणि शास्त्रोक्त तपासामुळे अल्पावधीत निकाल लागल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

No comments:

Post a Comment

💬 या बातमीबद्दल तुमची प्रतिक्रिया
आवडली
❤️
खूप आवडली
😮
धक्कादायक
😢
दुःखद
👆 प्रतिक्रिया निवडा

Menu